दिलासा
सेवाभावी संस्थांच्या कार्याला कुसुमाग्रजांनी ‘प्रकाशाची बेटे’ असे सुंदर नाव दिले आहे. सेवासदन संस्थेने आपल्या कार्याने हे शब्द अगदी सार्थ करून दाखविले आहेत.
११४ वर्षांपूर्वी आदरणीय कै. रमाबाईसाहेब रानडे यांनी परितक्त्या व बालविधवा या महिलांसाठी साकारलेली ‘सेवासदन संस्था’ अशा या संस्थारूपी वटवृक्षाखाली विसावलेली ‘दिलासा केंद्र’ ही ‘बौद्धिक अक्षम’ या दिव्यांग मुलांची शाळा गेली ४२ वर्षे कार्यरत आहे.
दि. १५ जून १९८२ रोजी मा. श्रीमती संध्याताई देवरूखकर यांनी संस्थेचे माजी अध्यक्ष मा. कै. निळूभाऊ लिमये यांच्या सहकार्याने ३० विद्यार्थी संख्येने “दिलासा केंद्र” या बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेची स्थापना केली. त्यांना सुरुवातीला शाळा चालविण्यात अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी आपले काम थांबविले नाही. या सर्व कामात संध्याताईंना त्यांच्या सहकारी श्रीमती सुहासिनी साठे यांचे अनमोल सहकार्य मिळाले.
आज दिलासात १०० बौद्धिक अक्षम मूले शिक्षण घेत आहेत. शाळेत ६ ते १८ वयोगटातील ३५ ते ७० बुध्यांक असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही मुले सर्वसाधारण शाळेतील मुलांबरोबर शिक्षण घेण्यास कमी पडतात म्हणून या मुलांसाठी विशेष शाळा आणि विशेष शिक्षकांची गरज असते. विशेष शिक्षणाबाबत असे म्हणतात की जर मी ऐकेन तर मी विसरेन, जर मी पाहीन तर मी लक्षात ठेवीन, जर मी करेन तर मी समजेन. एरवादी संकल्पना तोंडी समजावून सांगण्यापेक्षा तक्ता, प्रतिकृती व प्रत्यक्ष अनुभव यातून सांगितली तर त्याचा अधिक उपयोग होतो यानुसार शिक्षण दिले जाते. प्रत्येक मुलाची कमतरता तसेच त्यांच्या क्षमता लक्षात घेऊन विविध उपक्रमांद्वारे आणि नवीन नवीन माध्यमांद्वारे शिकवले जाते.
आता महाराष्ट्रातील सर्व बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेत समान अभ्यासक्रम असावा या दृष्टीने ‘दिशा प्रकल्प’ तयार करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
शाळेत बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना शिकविण्याचे प्रशिक्षण घेतलेले विशेष शिक्षक आणि संगीत, चित्रकला, शारिरीक शिक्षण, हस्तव्यवसाय इ. चे तज्ञ कलाशिक्षक आहेत. मुलांना प्रश्नमंजुषा, कोडी, विनोद सांगणे, स्मरण खेळ, अंताक्षरी, गोष्टी सांगणे, कॅरम, कार्टून्स पाहणे या गोष्टी खूप आवडतात, अशा मनोरंजनातूनही विद्यार्थी शिकत असतात. त्यांची स्थिरता वाढते, भाषा विकास, स्मरणशक्ती, सामान्यज्ञान, जिज्ञासा, कल्पनाशक्तीचा विकास होण्यास मदत होते. या बरोबर विद्यार्थ्यांना कॅलक्युलेटर, संगणक, वापराचे प्रशिक्षणही दिले जाते, योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम विपश्यना, पोहणे, विविध इनडोअर (कॅरम, सापशिडी इ.) व आऊटडोअर खेळ, विविध स्पर्धा, कवायत, लेझीम इ. चेही प्रशिक्षण दिले जाते. यामुळे मुलांमध्ये धीटपणा, आत्मविश्वास, खिलाडूपणा, वाढलेला दिसतो, तसेच हालचालीत सुसूत्रता, लवचिकपणा, सूक्ष्मकारक कौशल्यांचा विकास, स्नायूत ताकद, एकाग्रता वाढलेली दिसून येते, चंचलता कमी झालेली निदर्शनास येते
परिसर अभ्यासासाठी बँक, पोस्ट ऑफिस, उपहारगृहे, रेल्वेस्टेशन पोलिस स्टेशन, संग्रहालय, मॉल्स इ. ठिकाणी नेण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती, नियम कळतात. सार्वजनिक ठिकाणी शिष्टाचार संमत वर्तन करावे. शिस्त पालन, Toilet वापर इ. गोष्टींचे ज्ञान होते. दरवर्षी २५ विद्यार्थी पुणे मराठी ग्रंथालयात गेली १८ वर्षे वाचन, संगणक, LCD वर बाल चित्रपट, माहितीपट, विविध स्पर्धांमध्ये सहभाग, राखी, आकाशकंदील बनविणे प्रशिक्षण इ. सुविधांचा मोफत लाभ घेत आहेत. विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी रोज वाचून दाखवितात, त्यामुळे त्यांना बाहेरील घडामोडींचे ज्ञान होते, तसेच फोनचा वापर, (Landline व Mobile) ऑफिस बॉय सदृश्य कामे प्रथमोपचार, बागकाम, ज्वेलरी मेकिंग, भेटकार्ड बनवणे, रांगोळी शिवण व भरत काम, निरोप सांगणे, नाणी-नोटा ओळख, सोपे हिशोब, किचन युनिट मधील काही कामे इ. प्रशिक्षणही दिले जाते. याद्वारे व्यवसाय पूर्व प्रशिक्षणासाठी मदत होते.
दिलासातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा, नृत्य, नाट्य, गायन स्पर्धांमधून अंतरशालेय, जिल्हास्तरीय, राज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिके, बक्षीसे मिळवलेली आहेत. स्पेशल ऑलिंपिक (Olympic) तर्फे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कु. गौरी गाडगीळ हिने २००७ मध्ये चीन (शांघाय) येथे पोहणे स्पर्धेत ‘रौप्य पदक’, कु. संयुक्ता गोसावी हिने २०१५ मध्ये लॉस एंजिल्स (अमेरिका) येथे ‘बास्केटबॉल’ स्पर्धेत कांस्य पदक तसेच कु. गायत्री भालेराव हिने २०२३ मध्ये जर्मनी येथे टेबलटेनिस स्पर्धेत दुहेरीगटात सुवर्णपदक पटकावले. स्पर्धांमुळे विद्यार्थी यश-अपयश, प्रयत्न, सराव, मेहनत, भावनांवर ताबा, जिद्द या गोष्टी शिकतात.
शैक्षणिक नविन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांचे औक्षण व खाऊ देऊन करण्यात येते. प्रत्येक मुलाचा वाढदिवसही खाऊ देऊन साजरा केला जातो. शाळेची बस, पोषक व सकस आहार, खिचडी, मोफत होमिओपथी व फिजियो थेरपी उपचार, राष्ट्रीयन्यास, पालक मार्गदर्शन १८ वर्षांवरील मुलांसाठी दिलासा कार्यशाळा (एरंडवणे पुणे) येथे प्रवेश इ. सुविधा दिल्या जातात.
दिलासात सांस्कृतिक कार्यक्रमही साजरे केले जातात. जसे गणेशोत्सव, दहीहंडी, पुस्तकहंडी, नाताळ, दिवाळी, बाहुला बाहुलीचे लग्न इ. मुळे विद्यार्थ्यांना आपल्या सणांची संस्कृतीची माहिती होते. राष्ट्रीय सण (झेंडावंदन), संविधान दिन, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते. स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांचा आनंदोत्सवच असतो, यात प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.
पालक-शिक्षक यांचा समन्वय वाढावा म्हणून पालकांसाठी क्रीडा, सामान्य ज्ञान (प्रश्नमंजुषा), अंताक्षरी अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. पालक सभांमधून तज्ञ व्यक्तींद्वारे विविध विषयांचे मार्गदर्शन केले जाते. जसे-किशोरवयीन मुले-मुर्तीच्या समस्या, शासनाच्या विविध योजना इ. मुलांमधील झालेला विकास, प्रगती पाहून पालकांना आनंद समाधान वाटते
‘दिलासा’च्या या सर्व उपक्रमांतून विद्यार्थ्यांना समाजाभिमुख स्वावलंबी, आत्मनिर्भर बनविणे आणि सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले जातात. दिलासाचे काही माजी विद्यार्थी बाहेर त्यांच्या क्षमतेनुसार काम करीत असून घराला आर्थिक हातभार लावत आहेत.
‘दिलासा’च्या या वाटचालीत सेवासदन संस्थेचा खंबीर पाठिंबा तसेच दिलासाच्या माजी व आजी सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच विविध स्तरातून मिळणारे सर्वांचे सहकार्य अनमोल आहे
समाजानेही या मुलांचा स्वीकार सहानुभूती न दाखवता आनंदाने केला पाहिजे. या मुलांना गरज असते ती फक्त प्रोत्साहनाची, प्रेमाची व समजून घेण्याची..
‘या मुलांना या फुलांना गंध द्या, आनंद द्या, या कळ्यांना-पाकळ्यांना साद द्या, प्रतिसाद द्या’…
धन्यवाद.

सौ. सुचेता प्रदीप फासे
